सुप्रसिद्ध समकालीन कलाकार धीरज
धीरज श्रीकृष्णराव हाडोळे
धीरज हाडोळे हे मुंबईस्थित चित्रकार, छायाचित्रकार आणि कला अभ्यासक आहेत. त्यांची चित्रे समकालीन अमूर्त चित्रकलेतील शांत, अंतर्मुख प्रवाहाशी संवाद साधतात. रेषा, आकार आणि अवकाश यांचा सूक्ष्म संबंध त्यांच्या चित्रांतून उलगडतो. मर्यादित रंगसंगतीतूनही ते एक खोल, स्थिर अवकाश निर्माण करतात, जिथे त्रिकोणी आणि सममित आकार ध्यानात्मक लय घडवतात.
धीरज हाडोळे यांच्या चित्रांत सपाट कॅनव्हास हळूहळू अवकाशात रूपांतरित होत जातो. स्तरांवर उभारलेले आकार, शिवलेल्या पृष्ठभागांची संवेदनशील रचना आणि छाया प्रकाशांचे सूक्ष्म नाते यांमुळे चित्रात स्पष्ट त्रिमितीय परिणाम निर्माण होतो. आकार कॅनव्हासवर स्थिर न राहता पुढे येतात, मागे सरकतात आणि पाहणाऱ्याभोवती एक शांत अवकाश तयार करतात.या चित्रांत त्रिमिती ही दृश्य परिणाम अनुभव बनते. प्रत्येक स्तर, प्रत्येक कडा आणि प्रत्येक रंगछटा अवकाशाची जाणीव अधिक गडद करते. त्यामुळे चित्र पाहणे हा क्षण न राहता, त्या अवकाशात प्रवेश करण्याची प्रक्रिया ठरते. जिथे कॅनव्हास अनुभवाचा विस्तार बनतो. चित्रनिर्मितीची प्रक्रिया हळूहळू घडते. पृष्ठभागावर उभ्या राहणाऱ्या थरांमधून वेळेची जाणीव तयार होते. छाया प्रकाशाचे सूक्ष्म बदल, पोतांची शांत हालचाल आणि केंद्राकडे झुकणारी रचना पाहणाऱ्याला आत ओढून घेते.
प्रविण वाघमारे:
प्रविण वाघमारे यांच्यासाठी चित्रनिर्मिती ही आत घडणाऱ्या जाणिवांचा शांत आविष्कार आहे. रोजच्या जीवनातील साधी दृश्ये, निसर्गातील क्षण आणि समाजातील हालचाली त्यांच्या मनात एक सूक्ष्म तरंग निर्माण करतात. हाच तरंग हळूच रेषा, रंग आणि पोत यांचा आधार घेत कॅनव्हासवर उतरतो.दिसायला अमूर्त वाटणारी ही चित्रे प्रत्यक्षात वास्तवाशी घट्ट जोडलेली आहेत. पाहिलेलं, ऐकलेलं, स्पर्शलेलं प्रत्येक अनुभव आत साठत जातो आणि योग्य क्षणी प्रतिध्वनीसारखा चित्ररूप धारण करतो. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक रेषेत घाई नाही, प्रत्येक रंगात सांगोपांगपणा आहे.या चित्रांत भावना निवांतपणे श्वास घेतात. फॉर्म, रंग आणि पोत यांच्या प्रामाणिक संवादातून अनुभवांची खोली व्यक्त होते. चित्र पूर्ण करणे हा उद्देश नसून, त्या प्रक्रियेतून आतल्या अनुभूतींचं सत्य उलगडत जाणं हीच त्यांच्या चित्रकलेची खरी ओळख आहे.
कला समीक्षक राखी म्हणतात प्रविण वाघमारे यांच्या चित्रकलेत अनुभव, जाणिवा आणि अवकाश यांचा शांत संवाद घडतो. ही चित्रे पाहणाऱ्याला पाहण्यापेक्षा आत ऐकायला लावतात.त्यांच्या चित्रांत जाणिवा थेट उतरून येण्याआधी शांतपणे आत साठत जातात. रोजच्या दिसणाऱ्या क्षणांची, रंगांची, स्पर्शांची एक सूक्ष्म ठेव त्यांच्या मनात तयार होते. या साठ्यातून जे चित्र उलगडते ते सांगण्यापेक्षा अनुभवायला लावते.ही चित्रे अमूर्त आहेत, पण वास्तवापासून दूर नाहीत. त्यांतून चालत राहिलेल्या दिवसांचे, थांबलेल्या क्षणांचे आणि नकळत भिडलेल्या जाणिवांचे प्रतिबिंब उमटते. रंग इथे सजावट करत नाहीत; ते आतल्या हालचालींची खूण देतात. रेषा कधी स्थिर राहतात, कधी हळूच तुटतात जणू विचार स्वतःचा मार्ग शोधत आहेत.वाघमारे यांची चित्रे पाहताना समजण्यापेक्षा अनुभव अधिक महत्त्वाचा ठरतो, आणि त्या अनुभवातून अर्थ हळूहळू उलगडत जातो.
स्वप्नील विलासराव सांगोले : शिल्पातली शांत उपस्थिती स्वप्नील सांगोले यांची शिल्पे गतीपेक्षा स्थैर्यावर विश्वास ठेवतात. दगडाच्या माध्यमातून ती काळ, अवकाश आणि शांतता यांच्याशी अंतर्मुख संवाद साधतात. येथे घन आणि रिक्त. अवकाश यांचे नाते महत्त्वाचे ठरते. जे कोरलेले आहे तितकेच जे उर्वरित तेही अर्थपूर्ण बनते.या शिल्पांत स्मृती, परंपरा आणि आध्यात्मिक जाणिवांची सूक्ष्म चाहूल जाणवते. छिन्नीचे ठसे काळाची नोंद घेतात, तर संयमित रचना शिल्पाला शांत उपस्थिती देतात. सांगोले यांची शिल्पे पाहणाऱ्याला समजावून सांगण्याऐवजी थांबून अनुभवायला लावतात.“सांगोलेच्या शिल्पांत दगड आणि रिक्तता थांबून अनुभवायला लावते. शांततेतून अर्थ उलगडतो.” स्वप्निल विलासराव सांगोले यांचा कला-प्रवास हा काळाशी आणि स्मृतींशी चाललेला एक शांत संवाद आहे. भारतीय मंदिर स्थापत्यकलेतील आध्यात्मिक भार, कोरीव रेषांची शिस्त आणि दगडात साठलेला काळ त्यांच्या संवेदनांना सतत स्पर्श करत राहतो. मात्र ही परंपरा त्यांच्या हातात येऊन समकालीन अनुभवांचे नवे अर्थ धारण करते. दगड, पृष्ठभाग आणि अवकाश यांच्याशी काम करताना, प्रत्येक ठसा घाई न करता उमटतो. इथे शिल्प हळूहळू उलगडत जाते. वैयक्तिक अनुभव सामूहिक स्मृतींशी मिसळतात आणि शिल्प एक सेतू बनते. भौतिक आणि अधिभौतिक यांच्यामधला. अलीकडच्या काळात सहनिर्मिती आणि समुदायाशी संवाद साधणारे प्रकल्प त्यांच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले आहेत. कला दैनंदिन जीवनात उतरावी, प्रश्न विचारावे आणि आतल्या शांततेला स्पर्श करावा. हीच त्यांच्या कला-प्रवासाची खरी दिशा आहे.या प्रदर्शनातून कदा रसिकाला कला पाहताना, थांबून अनुभवण्याचा, शांततेत अर्थ शोधण्याचा अनुभव मिळतो.
कला समीक्षक राखी अरदकर