सुप्रसिद्ध चित्रकार सचिन सगरे यांचे "स्पंदने" या शिर्षकांतर्गत एकल चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे परवेझ दमानिया (संचालक, मुंबई आर्ट हाऊस) व सन्माननीय पाहुण्या सोनम शिवदत्त दास (अध्यक्षा, शिवदत्त दास आर्ट फाउंडेशन) लाभणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता संपन्न होईल.
सचिन सगरे यांच्या चित्रात ग्रामिण जीवनातील साधेपणा, स्रीयांचे भावविश्व, आपलेपणाचा सुवास, भक्तीमय संध्याकाळ व अध्यात्मीक जीवन हे विषय कॅनव्हासवर सुगंधी स्पंदनांच्या रूपाने चित्रित केलेले दिसतात.चित्रित करतांना स्वतः कलाकार त्या चित्रातील भक्तीमय सुवासात स्वतःला विसरल्याचा अभास होतो. खेडेगावचा मनाला भिडणारा निस्वार्थ साधेपणा, स्रीयांचे कष्टमय परंतू भक्तीमय संस्कार कलाकाराच्या मनात खूप खोलवर रुजलेले दिसतात. पवित्र संध्याकाळी स्रीयांचे भावविश्व चित्रीत करण्यासाठी सचिनने भारतीय परंपरेला साजेसे लाल, पिवळा व केशरी हे उबदार व गडद रंग वापरून विलक्षण भावनाप्रधान चित्रांची निर्मिती किली आहे. तसेच पार्श्वभूमिला अध्यात्मीक शिखरे, घरे, पाने व झाडी सुयोग्य परिणाम साधतात. रंग नुसताच कॅनव्हास वरती लावलेला नसून त्यामध्ये दर्जेदार व साजेसा पोत दिसून येतो पार्श्वभूमिला विशिष्ट करड्या रेखाटनाने, वैशीष्ट्यपूर्ण रंगलेपन व सुयोग्य विषयाच्या मांडणीने कलाकृती उठावदार व भावस्पर्शी वाटते.
भूतकाळात विरलेल्या आठवणी जशा मनामध्ये अस्पष्ट व हलक्या होत जातात, तसाच आभास चित्रातील रंग, पोत व रेखांकनातील बारकाव्यात जाणवतो आणि ही पुसटशी होणारी सुंदर प्रक्रिया तितक्याच तरलतेने पाहणाऱ्याच्या मनात स्पंदने निर्माण करते. आईच्या प्रेमाबद्दल नितांत आपुलकी, स्त्रियांच्या कष्टांचा, कर्तृत्वाचा, ममतेचा नितांत आदरभाव व स्त्रीशक्तीचा जागर या चित्रांतून सहज जाणवतो. चित्रनिर्मितीमधील कलाकाराचे कुंचल्यांचे अफाट कौशल्य, ॲक्रिलिक रंगमाध्यमाचे प्रभुत्व, रेखांकनात मानवाकृतीची बसण्याची ढब, हालचाल यांचे सूक्ष्म निरीक्षण चित्रणात दिसते. हे प्रदर्शन म्हणजे या चित्रांच्या माध्यमातून सचिन सगरे यांनी केलेला रंगीत स्पंदनांचा स्त्रीसन्मानच होय.
नुरील भोसले


