प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे निताई दास, डॉ. डी. एन. बारसकर सुभाष रॉय,डॉ.प्रलय दत्ता यांचे चित्र व यांच्या छायाचित्रांचे समूह प्रदर्शन ‘Roots and Reach: Four Artists, One Continuum
(मुळे आणि विस्तार: चार कलाकार, एक अखंड परंपरा)
नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, एसी गॅलरी, डॉ. एनी बेझन्ट रोड, वरळी, मुंबई येथे होणार असून प्रदर्शन दिनांक ०१ ते ०७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.
निताई दास:
निताई दास यांची चित्रकला ही आधुनिकतेच्या गदारोळातही भारतीय लोकसंस्कृतीशी असलेले नाते जपून ठेवणारा एक सशक्त कलात्मक प्रवास आहे. जामिनी रॉय (आई आणि मूल)आणि रामकिंकर बैज (सायंताळ फॅमिली)यांच्या भारतीय चित्र शैलीचा वारसा पुढे चालवत, त्यांनी पारंपरिक 'पट्टचित्र' शैलीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या कलाकृतींमध्ये शिव, गणेश, ख्रिस्त यांसारख्या पौराणिक व ऐतिहासिक प्रतिमा शेतकरी, पर्यटक आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय सहजतेने विणलेल्या दिसतात. स्थानिक मातीतील समृद्धता आणि वैश्विक दृष्टिकोन यांचा हा सुंदर मेळ आहे. त्यांची चित्रे केवळ कलात्मक आविष्कार नसून, भारतीय कृषी संस्कृतीचे आधुनिक जगाशी असलेले भावनिक नाते दर्शवणारा एक जिवंत दस्तऐवज आहेत.
______________________________________________________
डॉ. डी. एन. बारसकर:
डॉ.डी.एन.बारसकर यांचे छायाचित्रण हे दृश्य भपक्यापेक्षा श्रमाची प्रतिष्ठा आणि निसर्गाची शांतता अधोरेखित करणारे एक संवेदनशील माध्यम आहे. त्यांच्या कॅमेऱ्याची नजर श्रमानंतर विसाव्याच्या वेळचा प्रकाश, ग्रामीण जीवन आणि कामगारांचे दैनंदिन क्षण अत्यंत आदराने टिपते. बारसकर हे सामान्य वेळांना करुण सुंदर काव्यात बदलणारे प्रकाशाचे खेळ पकडतात जसे अंतर्मनात वाजणारे कोमल संगीत.व्यवहारीक चक्रापासून दूर राहून त्यांनी निसर्गात व्यतीत केलेला वेळ त्यांच्या छायाचित्रात स्पष्ट दिसतो. त्यांची छायाचित्रे ही विषयाला नाट्यमय न करता काळाच्या सहजतेला दिलेली एक सुंदर कलात्मक व शांतिप्रिय मानवंदना ठरते.
______________________________________________________
डॉ. प्रलय दत्ता:
डॉ. प्रलय दत्ता यांची अमूर्त शैली रूपकात्मक चौकटींना छेद देत स्थापत्यशास्त्राचा नवा दृष्टिकोन मांडते. कॅनव्हासवरील राखाडी व काळ्या भौमितिक आकारांमध्ये अचानक चमकणारे लाल-निळे रंग शहराच्या विविध भावनांना जिवंत करतात. 'शहरी उत्खनन' जाणवून देणारी ही चित्रे भारतीय शहरांमधील निरंतर निर्मिती व विनाशाचा ताणतणाव प्रभावीपणे रेखाटतात. उभ्या व काटकोनी आकृत्यांचा आधार घेत रंगांचा विस्तार समतोल राखला जातो. मानवी आकृत्यांशिवाय, निव्वळ रंग आणि आकारांच्या लयीतून भावना व स्थळाची मांडणी करण्याची दत्ता यांची कलात्मक क्षमता थक्क करणारी आहे. मानवी अस्तित्वाचा आणि नागरी विश्वाचा हा एक उत्कृष्ट कलात्मक प्रवास आहे.
______________________________________________________
सुभाष रॉय:
सुभाष रॉय यांची चित्रशैली आकृतीबंध आणि अमूर्ततेचा एक सुरेख संगम घडवून आणते. मऊ वस्त्रांमधील स्त्री-आकृत्या ओल्या रंगांच्या पार्श्वभूमीत सहजपणे विलीन होताना दिसतात. चेहऱ्यांवरील हावभावांपेक्षाही आकृत्यांमधील जवळीक, बसण्याची ढब आणि परस्परसंबंधांतून 'अव्यक्त बंध' अत्यंत प्रभावीपणे साकारले आहेत.
रंगांना सीमा ओलांडू देणारी त्यांची मोकळी आणि वातावरणात्मक तंत्रशैली निसर्ग आणि मानवी रूपांना एकमेकांत मिसळून टाकते. चित्रातील अमूर्तता वाढली तरीही त्यातील भावबंध आणि स्पर्शाची आत्मीयता कायम राहते. भावनांचा हा तरल व काव्यात्मक अविष्कार प्रेक्षकाला अंतर्मुख करतो.
नुरील भोसले

