जहांगीर कला दालनात यश अजिंक्य चौलकर यांच्या 'ड्युअल व्हिजन' या एकल शिल्पप्रदर्शनाचे आयोजन.


मुंबईतील प्रसिद्ध काला घोडा परिसरातील जहांगीर कला दालनात (जहांगीर आर्ट गॅलरी) २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान यश अजिंक्य चौलकर यांच्या 'ड्युअल व्हिजन' या एकल शिल्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहिल.




 

शिल्पकार यश अजिंक्य चौलकर यांनी मास्टर्स इन फाईन आर्ट्स हि शिल्पकलेची उच्च पदवी सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स,मुंबई येथून २०२४ मध्ये घेतली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्वतःच्या शिल्पांचा विकास केला. त्यांची शिल्प प्रदर्शने प्रतिष्ठीत आर्ट गॅलरीत झाली आहेत.त्यांचे 'ड्युअल व्हिजन' हे एकल प्रदर्शन केवळ दृश्यकलेचा आनंद देणारे नाही, तर ते मानवी मन, सामाजिक सत्तासंबंध आणि अस्मितेच्या गुंतागुंतीच्या थरांना स्पर्श करणारी एक बौद्धिक व आत्मशोधक सफर आहे. शिल्पे आणि मुखवट्यांच्या माध्यमातून मानवी अस्तित्वातील विरोधाभासांचा कष्टमय पण सुंदर प्रवास या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे.

 

या प्रदर्शनाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे 'द्वैतभावाचा' अत्यंत प्रभावी वापर. वर्चस्व आणि शरणागती, नियंत्रण आणि असुरक्षितता, तसेच निरीक्षक आणि निरीक्षित यांसारख्या परस्परविरोधी संकल्पनांना चौलकर यांनी आपल्या शिल्पातून जिवंत केले आहे. मुखवट्यांचा वापर केवळ एक अलंकार म्हणून न करता, मानवी स्वभावातील विविध गुणांचे प्रतीक म्हणून केला गेला आहे.


 

मुखवटे माणसाच्या बाह्य आवडीनिवडी आणि अंतरंग यांमधील दरी दर्शवतात. प्रेक्षक जेव्हा या कलाकृतींसमोर उभे राहतात, तेव्हा त्यांच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो"आपण केवळ कलाकृतीचे बाह्य निरीक्षक आहोत की, आपल्या स्वतःच्या नजरेतून आपण सत्तेचा वापर करत आहोत?" हा आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारा दृष्टिकोन या संपूर्ण प्रदर्शनाचा गाभा आहे. चौलकर यांनी संगमरवरी दगड,धातू अशा विविध माध्यमांचा अत्यंत प्रगल्भतेने वापर केला आहे. संगमरवरी मानवाकृती मानवी शरीराची कोमल संवेदना आणि कठीण वास्तवाचा मेळ घालतेली कलाकृती उत्कृष्ट ठरते.  





धातूची शिल्पे आधुनिक काळातील कठोरता आणि तांत्रिक वर्चस्वाचे दर्शन घडवतात. प्रत्येक शिल्पात कच्च्या पदार्थांचा पोत आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक खोली यांचा अचूक समतोल साधला गेला आहे. विखुरलेले चेहरे आणि अतिशयोक्तीपूर्ण स्वभाववैशिष्ट्ये, मानवी मनातील विस्कळीतपणा आणि दडपलेल्या कथांना गुढ व प्रभावीपणे प्रदर्शित केले आहे.  आजच्या गुंतागुंतीच्या समाजात स्वतःची ओळख टिकवून ठेवणे आणि 'इतर' घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर या प्रदर्शनात सूक्ष्म भाष्य केले गेले आहे. 


काल्पनिक गोष्टींमधून खऱ्या भावनांचा उगम कसा होतो, याचे उत्कृष्ट उदाहरण या शिल्पातून दिसते. येथे कलाकार आणि प्रेक्षक या दोघांच्याही पलीकडे जाऊन कलाकृती स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करते. यश चौलकर यांचे 'ड्युअल व्हिजन' हे प्रदर्शन म्हणजे केवळ रूपांची मांडणी नसून मानवी अस्तित्त्वाचा, वेदनेचा आणि सौंदर्याचा एक दस्तऐवज आहे. हे प्रदर्शन प्रेक्षकांना त्यांच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर काढून, आत्मशोध घेण्यास भाग पाडते. आधुनिक शिल्पकलेच्या प्रांतात मानवी मनाच्या तळाशी जाऊन विचार करायला लावणारा हा शिल्प समुहाचा खजिनाच आहे.

 

नुरील भोसले

Post a Comment

Previous Post More 4 Post