जहांगीर आर्ट गॅलरीत डॉ. शेफाली समीर भुजबळ यांचे 'कंटिन्युअम' हे एकल कला प्रदर्शन


जहांगीर कला दालनात (जहांगीर आर्ट गॅलरी) १३ ते १९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'कोलाहलातून शांततेकडे' या संकल्पनेवर आधारित डॉ. शेफाली समीर भुजबळ यांच्या 'कन्टीन्युअम' या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.

 




वनस्पतीशास्त्र विषयातील शैक्षणिक पार्श्वभूमी, लेखन आणि नृत्य अशा विविध क्षेत्रांतील पैलूंचे तेजस्वी प्रतिबिंब डॉ. शेफाली भुजबळ यांनी आपल्या चित्रांमध्ये साकारले आहे. संशोधक वृत्ती असल्यामुळे विश्वाच्या कोलाहलातून शांततेच्या शोधातील भावनांचा प्रवास त्या चित्रांमधून दाखवतात. निसर्गाशी घट्ट नाते असल्यामुळे अंतर्मनातील भावविश्वाचा शोध रंगांच्या माध्यमातून घेतलेला जाणवतो. हिरवा, जांभळा, केशरी, पिवळा आणि निळा अशा गडद रंगांच्या सभोवती पांढऱ्या, राखाडी व शांत रंगछटांचा प्रभावी वापर केल्यामुळे अप्रतिम चित्रनिर्मितीची प्रचिती येते. विश्वाच्या गतिमान जीवनाच्या कालचक्रातून स्थिर शांततेकडे जाऊन तो निरव अनुभव घेण्याचे आनंदी क्षण त्यांच्या रंगलेपनात दिसून येतात. हे भावस्पर्शी रंगीत फटकारे चित्र काढताना कलाकाराला आणि चित्र पाहणाऱ्या कलारसिकांना तितकाच आनंद प्रदान करतात.त्यांची भारतात तसेच दुबई,रशिया देशात ही  एकल प्रदर्शने झाली आहे.

 



कॅनव्हासवरील त्यांच्या या कलाकृतींमध्ये रंगांचे थर विशिष्ट व स्पष्ट पोत (टेक्चर) तयार करतात. रंगलेपनातील जागतिक घडामोडींची अस्थिरता आणि त्याच वेळी पांढऱ्या व राखाडी उजळ रंगछटांची समंजस मांडणी चित्राला एक भावनिक परिपक्वता मिळवून देते. भरतनाट्यमच्या नृत्यकौशल्यामुळे तोल आणि लय या बाबी चित्रांमध्ये सहज व स्पष्टपणे जाणवतात. ही चित्रे वरवरची वाटत नसून, जीवनातील वास्तवता व खोली प्रत्येक रंगाच्या फटकाऱ्यासह जाणवते; त्यातील अमूर्त आकारांना निर्मळ शांततेची प्रतीक्षा आहे असा भास होतो. चित्रांना कोणतीही नावे नसल्याने कलारसिक स्वतःच्या अनुभवातून चित्रातील आशय समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना अध्यात्मिक शांततेची अनुभूती मिळते. परिपक्वता पांघरलेले हे रंग विश्वातील वास्तववादी संघर्षाचे प्रतीक असून, त्यांचा प्रवास शांततेकडे व अध्यात्माकडे जाणारा आहे व असावा असा संदेश डॉ. शेफाली समीर भुजबळ यांनी या प्रदर्शनातून प्रभावीपणे मांडला आहे. 



 

नुरील भोसले

Post a Comment

Previous Post More 4 Post