सुप्रसिद्ध चित्रकार विकास कर्वे यांचे “एम्ब्रास” (Embrace) हे एकल चित्र प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक २७ एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामूल्य पाहता येईल.
निसर्ग हा अनेक परिसंस्थांनी बनलेला आहे. मग ती छोटी असो अथवा मोठी. ती प्रत्येक परिसंस्था आपली स्वतंत्र ओळख जपत सभोवतालच्या अस्तित्वाशी एकरूप झालेली असते. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी दिसणारी तिची रूपं जशी स्वतःमध्ये परिपूर्ण असतात तशीच ती सभोवतालच्या अस्तित्वालाही पूर्णत्व देण्याच्या स्वाभाविक गुणधर्माने जगत असतात. कदाचित परस्परपूरकत्व हा जणू स्वभावच निसर्गाचा. प्रत्येक परिसंस्था आपल्यासमोर असंख्य गुणधर्म प्रकट करते. तिची प्रत्येक अभिव्यक्ती मग ती कोणत्याही स्थळाची वा ऋतूची असो, आपल्याला मनाच्या प्रसन्नतेबरोबर व्यापक जीवनदृष्टी सुद्धा प्रदान करत असते.
म्हणूनच प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग म्हणतो की –
“जर तुमचं निसर्गाशी मनापासून प्रेम असेल तर तुम्हाला सौंदर्य जाणवेल”
If you truly love nature, you will find beauty everywhere. – Vincent van गोघ
निसर्गाची क्षणाक्षणाला प्रकट होणारी सौंदर्य आणि त्या मागे दडलेली रहस्य टिपण्यासाठी फक्त पंचेंद्रिय पुरेसे नसतात, तर समोरच्या अस्तित्वाला व्यापक परिप्रेक्षात सामावून घेऊन त्यांचं अद्भुत मर्म ओळखणारं कलावंताचं मन गरजेचं असतं आणि ते फार थोड्याजवळ असतं. खरे कलावंत आपल्याला समजलेलं मर्म-रहस्य समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.
असाच एक छोटासा प्रयत्न सांगलीचे चित्रकार श्री. विकास कर्वे यांनी आपल्या EMBRACE – In pursuit of the Colossal being या शीर्षकाखाली सादर होत असलेल्या चित्रप्रदर्शनातून केला आहे.
चित्रकार कर्वे यांची चित्रे समुद्र आणि भोवतालच्या विराट अस्तित्वाचा शोध घेताना दिसतात, पण ती फक्त विराटतेच्या शोधापाशी थांबत नाहीत. तर सागराच्या धैर्य, स्थिरता, अखंड लाटा, भरती-ओहोटीचं चिरंतर तत्त्वज्ञान, सागर किनाऱ्याचे जीवन, बोटी, वाळूचे आकार, तेथील सजीव-निर्जीव अशा अनेक व्यक्त-अव्यक्त घटकांना सामावून घेतात.
खरं तर समुद्र पर्यटनासाठी निघालेला खलाशी जसा प्रवासादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चढ-उताराला आलिंगन देत पुढे वाटचाल करतो, अगदी तसंच समुद्राच्या विविध रूपांना आलिंगन देत भावभावनांना स्वतःमध्ये आत्मसात करून ती आपल्या चित्रकलेतून मांडण्याचा प्रयत्न चित्रकार विकास कर्वे यांनी केला आहे.
विकास कर्वे हे “रंग म्हणजे निसर्गाच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू होय” या वचनावर श्रद्धा असलेले चित्रकार आहेत. सागराच्या परिदृश्याचे चित्र निरनिराळ्या बाजूने व किती प्रकारांनी करता येईल याचा वस्तुपाठच त्यांच्या विविध चित्रातून आपल्याला पाहायला मिळतो.
चित्र प्रदर्शनासाठी हा विषय निवडण्यामागे त्यांचे समुद्राविषयी लहानपणापासूनचे कुतूहल आणि प्रेम जसे कारणीभूत आहे, तसेच रंग, रूप, रेषा आणि आकारांशी एकात्म झालेले त्यांचे मित्र चित्रकार प्रा. सत्यजित वरेकर यांची प्रेरणा व मार्गदर्शनही कारणीभूत आहे.
थोडक्यात सांगायचे तर चित्रकार विकास कर्वे यांनी रंगरेषा आणि आकारांच्या साहाय्याने आपल्या कलेतून सागराच्या विराट अस्तित्वाला बोलते केले आहे. म्हणूनच कदाचित श्री. कर्वे चित्र काढत नाहीत, तर ती त्यांच्या कडून उमलत जातात असे आपल्याला चित्राकडे पाहिल्यावर जाणवत राहत हे नक्की....!
चित्रकार - विकास भूपाल कर्वे
जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
दिनांक - २७ एप्रिल ते ३ मे २०२६
वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत



