या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. लीना साटम (निवृत्त प्राध्यापक, संशोधक व प्रवास लेखिका) आणि श्री. सुनील जी. उदासी (मुख्य व्यवस्थापक, कॉर्पोरेट समन्वय, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) यांच्या शुभहस्ते दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वा. होईल.
निसर्गचित्रकला ही केवळ सुंदर दृश्यांची हुबेहूब नक्कल नसते, तर ती निसर्गातील चैतन्य, त्याचे बदलणारे भाव आणि कलाकाराचे निसर्गाशी असणारे आत्मिक नाते दर्शवणारे माध्यम असते. राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून याच भावनिक आणि तांत्रिक अंगाला अतिशय समर्थपणे न्याय दिला आहे.
राजेंद्र चव्हाण हे प्रसिद्ध निसर्गचित्रकार आहेतच, पण ते एक उत्कृष्ट कलाशिक्षकही आहेत. त्यांची कला-बीजे विद्यार्थ्यांपर्यंत सुदृढपणे पोहोचावीत, असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
चव्हाण यांच्या कलाकृतींचे सर्वात बलस्थान म्हणजे प्रकाशाचा लपंडाव आणि वातावरणातील जिवंतपणा. निसर्गचित्रणात प्रकाश आणि सावलीवर नियंत्रण मिळवणे हे मोठे आव्हान असते. चौहान यांच्या चित्रांमध्ये पहाटेचे कोवळे सोनेरी किरण असोत किंवा संध्याकाळची हळवी केशरी-जांभळी छटा असो, निसर्गातील प्रत्येक प्रहरी बदलणारे वातावरण प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांच्या चित्रांमधील प्रकाश हा केवळ कागदावर चमकत नाही, तर तो संपूर्ण चित्राला एक जिवंत श्वास देतो.
चित्राची रंगसंगती आणि टेक्चरचा (पोत) वापर चित्रात एक वेगळीच खोली निर्माण करतो. चित्रे पाहताना ती सपाट न वाटता एका त्रिमितीय आभासासह प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करतात. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, जंगलांची घनदाट रचना आणि पाण्याचा पृष्ठभाग या सगळ्यांमध्ये त्यांनी रंगांच्या थरांचा अतिशय अभ्यासपूर्ण वापर केल्याचे चित्रणात जाणवतो.
चव्हाण यांच्या कुंचल्याला ऋतूंच्या बदलांचे विलक्षण भान आहे. उन्हाळ्याची रखरख, पावसाळ्यातील हिरवाई आणि धुक्याची चादर किंवा हिवाळ्यातील गारवा निसर्गाचे हे सगळे रूप त्यांच्या कलाकृतींमधून सहजतेने व पारदर्शक जलरंगात प्रकट होतात. पर्वतरांगांचे महाकाय रूप असो किंवा वाहत्या पाण्याच्या लहरी असोत, प्रत्येक घटकात निसर्गाची भव्यता आणि पावित्र्य जाणवते.
राजेंद्र यांची निसर्गचित्रकला ही केवळ डोळ्यांना सुखवणारी दृश्ययात्रा नाही, तर ती मनाला शांतवणारी आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी एक आध्यात्मिक अनुभूती आहे. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाचे शाश्वत सौंदर्य आणि मानवी मनाची शांतता यांचा एक सुरेख संगम पाहायला मिळतो. कलेच्या पटलावर त्यांची शैली ही त्यांच्या सखोल निरीक्षणाची, कौशल्याची आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाची साक्ष देते.
नुरील भोसले
