जहांगीर आर्ट गॅलरीत राजू औताडे यांचे "इकोज ऑफ नेचर" हे एकल चित्र प्रदर्शन

  


मुंबईतील प्रसिद्ध काला घोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरीत २३ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान राजू गंगाधर औताडे यांच्या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.




 

कोणत्याही मोठ्या कलाकाराच्या जडणघडणीत त्याच्या बालपणीच्या अनुभवांचा मोठा वाटा असतो. नदीच्या परिसरातील सुखद गोडवा, झाडांशी संवाद, पानांच्या सळसळीचे सूर, वाऱ्याची शीळ आणि फुलपाखरांच्या रंगांमागे धावणे हे केवळ बालसुलभ खेळ नव्हते, तर ती राजू औताडे यांच्या उपजत कलाप्रवासाची पहिली पाठशाळा होती. निसर्गातील हा अफाट मोकळेपणा आणि निखळ शांतता त्यांच्या कोवळ्या मनावर कायमची कोरली गेली, जिची प्रचिती पुढे त्यांच्या चित्रांमधील शांत भावातून येते. निसर्गात वावरलेल्या या बालपणीच्या अविस्मरणीय आठवणी परिपक्व अध्यात्माच्या स्वरूपात आपल्या चित्रणात मांडण्यात चित्रकार पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.




 

केवळ ओढ असून चालत नाही, तर त्याला अभ्यासाची आणि कौशल्याची जोड असावी लागते. त्यांनी 'एटीडी' (Art Teacher Diploma) आणि अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून 'जी.डी. आर्ट पेंटिंग'चे उच्च शिक्षण घेतले. या सर्व टप्प्यांनी त्यांच्या कलेला एक परिपक्व आणि व्यावसायिक आकार दिला आहे. त्यांची चित्रप्रदर्शने बऱ्याच कला दालनांत झाली असून ते एक सक्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. तंत्र आणि भावना यांचा हा सुवर्णमध्य त्यांच्या प्रत्येक कुंचल्याच्या फटकाऱ्यात जाणवतो.





शांती, प्राणायाम, आत्मिक स्थिरता, ध्यानधारणा आणि आसनांच्या समाधी अवस्थेचे त्यांच्या चित्रणात उच्च स्थान आहे. नदीचे शांत पात्र, दूरवर विरून जाणारे अस्पष्ट जांभळे डोंगर, मातीचे सर्वसमावेशक राखाडी रंग आणि आकाशाचे अवखळ रूप जेव्हा त्यांच्या अंतर्मनात उतरतात, तेव्हा त्याचे रूपांतर एका ‘ध्यानअवस्थेत’ होते. हे ध्यान त्यांच्यासाठी केवळ एकाग्रता नसून विश्वशक्तीशी एकरूप होण्याचे माध्यम आहे.

या कलाकृतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेषा, वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन यांसारख्या भूमितीय आकारांचा केलेला अध्यात्मिक वापर. वर्तुळ हे पूर्णतेचे आणि चक्राचे प्रतीक आहे, त्रिकोण हा ऊर्ध्वगामी ऊर्जेचा निर्देशक ठरतो, तर चौकोन पृथ्वीतत्त्वाचा स्थैर्यभाव दर्शवतो. निसर्गातील मुक्त आणि अफाट रूप जेव्हा या शिस्तबद्ध भूमितीय चौकटीत विविध रंगांच्या सूक्ष्म फटकाऱ्यांनी बंदिस्त होते, तेव्हा एक वेगळीच वैश्विक ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा अनुभव कलारसिकाला निश्चित आल्याशिवाय राहणार नाही.

 

– नुरिल भोसले

 

Post a Comment

Previous Post More 4 Post